पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, नागरिकांना सांस्कृतीक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा. यासाठी महापालिकेने शहरात चार नाट्यगृहांची निर्मिती केली आहे. मात्र, त्याचा वापर सांस्कृतीक कार्यक्रमापेंक्षा इतर खासगी कार्यक्रमांसाठी जास्त प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने महिन्यातील चार रविवार सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे आरक्षित ठेवावीत, अशी मागणी संस्कार भारती आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी चार नाट्यगृहांची निर्मिती केली आहे. पिंपरीत आचार्य अत्रे प्रेक्षागृह, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह महापालिकेने निर्माण केले आहे. परंतू, प्रेक्षागृहात नाटकापेक्षा खासगी संस्थाचे कार्यक्रम, चर्चासत्रे, मेळावे, राजकीय पक्षाचे मेळावे, महापालिकेचे कार्यक्रम जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नाट्य संस्थेचे नाटकांचे प्रयोग होईनासे झाले आहेत. शहरातील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग लावण्यास निर्माते धजावत नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यगृहांना अवकळा आली आहे. नाट्यगृह व्यवस्थापकांच्या उदासिनतेचा फटका रसिक श्रोत्यांना बसू लागला आहे. यामुळे शहरातील नव्याने उदयास येणारी सांस्कृतिक चळवळ ठप्प होवू लागली आहे.
प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे अनेक नाट्यसंस्थानी प्रेक्षागृहाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्रेक्षक, रसिकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यासाठी महापालिकेने दर महिन्यातील चार रविवार नाट्यगृहे सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवावीत. त्यामुळे नाट्य संस्था, निर्माते नाटकांचे प्रयोग लावतील. त्याचा शहरातील रसिकांना लाभ घेता येईल, असे गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.