पिंपरी (Pclive7.com):- दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ३७ वा गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाभिक समाजाबाबत चनिंदनीय वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे नाभिक समाज समस्त महाराष्ट्र राज्याच्या उपहासाचा आणि निंदेचा विषय बनला आहे. यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बाराबलुतेदार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच पिंपरी येथील आंबेडकर चौकामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूराव काशीद, प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे, बाराबलुतेदार महासंघाचे उपप्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, युवा प्रदेशाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघाचे विशाल जाधव,भारतीय मायनोंरिटीज महासंघाचे युवा प्रदेशाघ्यक्ष अमित कांबळे, जाणिव फांऊडेशनचे सचिव रमेश जाधव, रामदास सूर्यवंशी, रमेश राऊत, प्रदीप वाळुंजकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अशोक मगर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दौंड येथे साखर कारखान्याच्या सभेमध्ये भाषण करताना विरोधकांना टोला लावताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक न्हावी ३-४ ग्राहक आल्यावर एकाला लावतो, त्याची आर्धी कापतो, दुस-याची आर्धी कापतो. तो नाही जाणार म्हणून तिस-याची शेंडी कापतो’. या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे माफी मागावी याकरिता हा निषेध करण्यात येत आहे.
‘दशक्रिया’ चित्रपटात नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध
दशक्रिया चित्रपटात चित्रपट दिग्दर्शकाने नाभिक समाजाबद्दल आक्षेपजनक वक्तव्य व चित्रीकरण केले आहे. नाभिक समाज आपले काम इमानदारीने करीत आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणताही नाभिक चित्रपटात दाखविल्याप्रमाणे वागत नाही. त्यामुळे चित्रपटात नाभिक समाजाबद्दल आक्षेपजनक सिन दाखविण्यात आले आहेत. यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यापुढे अशी घटना घडू नये, असे यावेळी सांगण्यात आले. याबाबत देखील महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बाराबलुतेदार महासंघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले.