पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच बँकांनी दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर करावा, तसेच नामफलक देखील मराठीतच करावेत. येत्या १५ दिवसांत हा बँकांनी हा बदल न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कायदेशीर तरतुदीनुसार सर्व बँकामध्ये दैनंदिन कामकाज करताना बँकेचे अर्ज, पैसे काढणे, भरणे, सूचना फलक, कर्मचार्यांचे नाव तसेच ग्राहकांशी संवाद प्रादेशिक भाषा म्हणजेच मराठीत झाला पाहिजे. मात्र हा कायदा धाब्यावर बसवून बहुतांश बँकामध्ये दैनंदिन कामकाजात सर्रास मराठी भाषेची पायमल्ली होताना दिसून येते. त्याचबरोबर सर्व आस्थापनांनी आपले नामफलक हे मराठीतच असले पाहिजे असाही नियम आहे. परंतू त्याबाबतीतही सर्वत्र अनास्थाच दिसून येते.
या सर्व बाबींचा विचार करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बँका व आस्थापनांमध्ये मराठी भाषेचाच वापर आणि मराठीतच नामफलक झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व बँकांना १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. बँकांना त्यात बदल न केल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला अंकुश तापकीर, राजू सावळे, हेमंत डांगे, राजेश आवसरे, रूपेश पेटकर, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.