पिंपरी (Pclive7.com):- महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा संजीवन समाधी महोत्सव सोमवार (दि.२७ नोव्हेंबर) ते शुक्रवार (दि.८ डिसेंबर) दरम्यान संपन्न होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी हे कलाकार यावर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत. सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांना करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते या वर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते.
चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजता परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. पंढरीनाथ गोपाळ मोरे-इनामदार, विश्वस्त सुनील मोरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पंढरीनाथ अण्णा पठारे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत. बुधवार (दि.६ डिसेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजता संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या वतीने सामुहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. सोमवार (दि.२७ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.३ डिसेंबर) दरम्यान सायंकाळी पाच ते सात या वेळात ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांची ‘दत्त संप्रदाय व गुरुशिष्य परंपरा’ यावर प्रवचने होणार आहेत.
मंगळवार (दि.५ डिसेंबर) रोजी सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते होईल. सकाळी नऊ वाजता गणेशयाग होईल. दुपारी दोन वाजता कै. अखिल शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ आरोग्य व दंत चिकित्सा व मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता सोलापूर येथील अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘नाती जापूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री साडेआठ वाजता जितेंद्र अभ्यंकर व राधा मंगेशकर मोगरा फुलला हा संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत.
बुधवार (दि.६ डिसेंबर) रोजी सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी नऊ वाजता सामुदायिक महाभिषेक, नऊ वाजता श्री दत्तयाग होणार आहे. सकाळी साडेनऊ पासून रक्तदान शिबीर सुरु होणार आहे. शिबिराचे उदघाटन विश्वस्त अॅड. राजेंद्र उमप यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता सोलापूर येथील अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘नाती जापूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री आठ वाजता आनंद भाटे यांचा आनंदरंग हा कार्यक्रम होईल.
गुरुवार (दि.७ डिसेंबर) रोजी सकाळी सहा वाजता गोंदवलेकर महाराज आरती मंडळ काकड आरती करणार आहेत. सकाळी नऊ वाजता महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन, नऊ वाजता दत्तयाग, साडेनऊ वाजता नेत्र चिकित्सा शिबीर व माफक दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता संभाजी भिडे गुरुजी यांचे भगवान श्री छत्रपती आणि आपण या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. रात्री साडेआठ वाजता पर्कशन्स कलाकार तौफिक कुरेशी यांचे जेंबे वादन व तन्मय देवचक्के यांचे हार्मोनियम वादन होणार आहे.
शुक्रवार (दि.८ डिसेंबर) रोजी मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक करून सकाळी सात वाजता भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ ते १०.३० या वेळात ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धनधान्य संकलनाची व्यवस्था श्री मोरया यात्री निवास व श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे करण्यात आली आहे. दरम्यान, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टला दिला.
काही मुख्य कार्यक्रम –
# सोमवार (दि.२७) ते शुक्रवार (दि. ८) रोजी दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळात सतीश कुलकर्णी श्रीमोरया गोसावी चरित्र पठण करणार आहेत.
# २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर रोजी दररोज सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गुरुचरित्र पठण होणार आहे.
# २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर रोजी दररोज दुपारी १ ते २ आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत.
# २८ व २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९ ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे यांचे कीर्तन होणार आहे.
# ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत तानसेन संगीत विद्यालय सुगम संगीत सादर करणार आहे.
# १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता डॉ. जयंत करंदीकर यांचे गुरुमहात्म्य या विषयावर प्रवचन होणार आहे.
# २ व ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रणव देव यांचे श्रीमोरया गोसावी या विषयावर कीर्तन होईल.
# ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता उचगांवकर सर यांचे योगासन वर्ग, पाच वाजता विनोद कुलकर्णी व जयश्री कुलकर्णी हे आठवणीतली गाणी सादर करतील. तर रात्री ७ वाजता जागृती कला मंच उगवला चंद्र पुनवेचा हा नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत.