पिंपरी (Pclive7.com):- महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्याली जाते. स्वहस्ते निर्माण केलेल्या घरगुती वस्तू विक्री करण्यासाठी ही हक्काची बाजारपेठ मानली जाते. या जत्रेत सहभागी होण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण समितीअंतर्गत पवनाथडी आयोजित केली जाते. पवनाथडीच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून जिज्ञासू महिलांनी घरात तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. पवनाथडीत जवळपास ८०० स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. हे स्टॉल्स मिळवण्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील महिला बचत गटांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. ८ डिसेंबर पर्यंत बचत गटांनी स्टॉल्ससाठी अर्ज करायचे आहेत. त्यासाठी महिला बचत गटांच्या स्थापनेपासून बँकेतील व्यवहार, ठेवींवरील व्याजाची प्रतिपूर्ती, कर्ज हप्त्यांची परतफेड व सातत्य असलेल्या महिला बचत गटांनाच विचारात घेतले जाणार आहे. नवीन महिला बचत गटांना पवनाथडी जत्रेत सहभागी होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होणे नियमाधीन आहे. दीड वर्षाला एक महिना कालावधी अपुरा असल्यास अशा बचत गटांना जत्रेत सहभागी होता येणार नाही, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. विहित मुदतीत आलेल्या अर्जाचा यासाठी विचार केला जाणार आहे, असेही नागरवस्ती विकास योजना विभागाने सूचित केले आहे.























Join Our Whatsapp Group