पिंपरी (Pclive7.com):- पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक अाहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोचे काम हे सध्या नाशिकफाटा ते खराळवाडी आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारण्यात आले आहेत. याबरोबर पीअर कँप शिवाय ११ खांब उभारले गेले आहेत. तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हँरिस ब्रिज येथील काम हे ७ डिसेंबर पासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चरल पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पँन हा अंदाजे २६ डिसेंबर पर्यंत तयार असेल अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी यावेळी दिली.