पिंपरी (Pclive7.com):- रक्षक चौकाजवळ गोळीबार करून खून केल्याच्या प्रकरणात सरकारी पंच म्हणून सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महापालिकेच्या करसंकल विभागाचे सहमंडल अधिकारी यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याची दोषसिद्धी वाढवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याची पंच म्हणून सेवा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी / अधिकारी या आदेशाला केराची टोपली दाखवत पंच म्हणून सेवा देण्यास नकार देत आहेत.

बुधवारी (दि.२३) रक्षक चौक, पिंपळे निलख येथे सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सांगवी पोलिसांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महापालिकेच्या करसंकल विभागाचे सहमंडल अधिकारी यांना सरकारी पंच म्हणून सेवा देण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पत्राकडे कानाडोळा केला. त्यामुळे सांगवी पोलिसांनी शासन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.






















Join Our Whatsapp Group