पिंपरी (Pclive7.com):- भक्ती शक्ती उद्यान चौकाजवळ निगडी गावठाणाला लागून असलेली एक एकर जागा शिवजयंती व अन्य उपक्रमांसाठी देण्याचा पीएमआरडीए प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा. त्याऐवजी भक्ती-शक्ती उद्यान चौकाजवळील पेठ क्रमांक २४ मधील जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात यावी, अशा मागणीचे साकडे भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीसह विविध संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी (दि.२५) घातले.

माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यासह अण्णासाहेब कसबे, भाऊसाहेब आढागळे, युवराज कोकाटे, नकुल भोईर, प्रदीप पवार, धनाजी यळकर, शिवाजी साळवे, सतीश काळे, ब्रह्मानंद जाधव आदींनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती तसेच सामाजिक संघटना आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी निगडीतील भूखंडाबाबतची मागणी उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त महिवाल यांनी लोकप्रतिनिधी व विविध संस्थांच्या मागणीचा विचार करून, पेठ क्र.२१ येथील निगडी गावठाणाला लागून असलेली पीएमआरडीएच्या ताब्यातील खुली जागा क्र.९ निगडी, सर्व्हे नं.८३ मधील एक एकर (४० आर.) एवढे क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १८ ऑगस्ट २०२३ रोजी हस्तांतरीत केली आहे.

पीएमआरडीएने दिलेली जागा ही निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह तातडीने रद्द करावा. तसेच, आमच्या मागणीप्रमाणे भक्ती-शक्ती शिल्पालगतचा पेठ क्रमांक २४ मधील संपूर्ण भूखंड सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा. जर आपण तसा निर्णय घेतला नाही तर आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.






















Join Our Whatsapp Group