पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील नऊ महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. कामगारांची उपासमार सुरु असून त्यांनी उपोषण सुरु केले आहे. या कामगारांचे तत्काळ थकीत वेतन अदा करावे अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. कामगारांची व्यथा मांडली. त्याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत सरकारने 1954 मध्ये रसायनी येथे या कंपनीची स्थापना केली. या कंपनीत रसायनिक खते तयार होतात. कंपनीतील कामगारांचे नऊ महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कामगारांचे वेतनाचा प्रश्न सोडविण्याची विनंती करुनही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे कामगारांनी 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरु केले आहे.
कामगारांचे जानेवारीपासूनचे वेतन थकले आहे. 28 महिन्यांचा 62 कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी कामगारांना द्यायचा आहे. कामगारांना 2017 पासून सीओडी लागू करावी. सुरक्षा, अग्निशमनची व्यवस्था पुन्हा द्यावी. कंपनी व्यवस्थित चालविण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची तातडीने नियुक्ती करावी. मार्च 2022 नंतर सेवानिवृत्त झालेल्या 60 कर्मचा-यांची ग्रॅच्युटी द्यावी. कंपनी पुन्हा सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा. कंपनी सुरु ठेवावी. कंपनी सुरु ठेवणे शक्य नसेल. तर, स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) लागू करावी. कामगारांची थकीत सर्व देणी द्यावीत अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
तत्काळ वेतन देण्याचे मंत्र्यांचे सचिवांना आदेश..
हिल इंडिया लिमिटेडच्या केरळ, पंजाबमधील बठिंडा येथील दोन्ही युनिट बंद करण्यात येतील. रसायनी युनिट चालू ठेवण्यात येईल. युनिटमधील सर्व कामगारांचे वेतन देण्याबाबत मंत्री मांडवीया यांनी सचिवांशी चर्चा केली. तत्काळ वेतन देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच कामगारांचे थकित वेतन मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.