पिंपरी (Pclive7.com):- समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे शहरातील १० ध्येयवेड्या तरुणांनी सायकलीवर पुणे ते वाघा बॉर्डर अशा अनोख्या मोहिमेचे आयोजन केले आहे. ‘मराठा वॉरियर्स’ असे ध्येयवेड्या तरुणांच्या समुहाचे नाव आहे.
मराठा वारियर्स या समुहाने सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा ४ राज्यातून १८ दिवस प्रवास करुन हे १० सायकलस्वार २ हजार किमी अंतर पूर्ण करणार आहेत. या तरुणांच्या मार्गावर येणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील तरुणांना ‘भारतीय लष्कारामधील संधी’ यावर प्रबोधन कराणार आहेत. याच बरोबर सायकल व आरोग्याचे महत्त्व पटवून देणार आहेत.
मराठा वारियर्स या समुहाने यापूर्वीही साहसी मोहिमा पूर्ण केल्या असून सायकलवर एखाद्या मोहिमेसाठी जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. मराठा वारियर्स मध्ये राम फुगे, निलेश धावडे, विश्वास काशिद, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशा या ध्येयवेड्या तरुणांचा सहभाग आहे.