पिंपरी (Pclive7.com):- उद्योगनगरीत साडेआठ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या दणदणाटाने कानठळ्या बसवल्या. तब्बल १०८ मंडळांनी ठरवून दिलेली आवाजाची ७० डेसिबलची पातळी ओलांडली. या सर्व मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. याविषयीचा अहवाल पोलिस न्यायालयात सादर करणार आहेत.

गुरुवारी (दि.२८) गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळांच्या आवाजाची पातळी मोजण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. ज्या मंडळांनी ‘डीजे’चा आवाज वाढवली त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यंदा १०८ मंडळांनी आवाजाची पातळी ओलांडल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवातील आवाजाची पातळी मोजण्याचे काम दरवर्षी सीईओपी कडून होते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये आवाज मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. पोलिसांकडूनच याची नोंद ठेवली जाते. नियमानुसार रात्री ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज नसावा, तसेच मनुष्यवस्ती असलेल्या ठिकाणी याहून कमी आवाजाची मर्यादा आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत आवाजाने १०० डेसिबल पार केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १०८ मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. या मंडळांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळाचा अहवाल तयार करून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. एका मंडळावर खटला दाखल करण्यात आला आहे.– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड






















Join Our Whatsapp Group