पिंपरी (Pclive7.com):- पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर आणि परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ही सूचना केली. चाकण शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. त्यावर हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना पवार यांनी या वेळी केली.
चाकण एमआयडीसीकडे ४२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेऊन उर्वरित पाणी गावांत पिण्यासाठी द्यावे. चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबवावेत.