पिंपरी (Pclive7.com):- प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला संपूर्ण राज्यभर प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, कॉलेजे यांना सुट्टी दिली असून अनेक भागात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. संपूर्ण शहरात मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी शांततेत बंद पाळावा, असे आवाहन विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहरात ठिकठिकाणी मोर्चे काढून आंदोलन केले जात आहे. पिंपरी चौक परिसरातील दुकाने जमावाकडून जबरदस्तीने बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रकार घडला आहे. तर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये उभा असलेला टेम्पो फोडण्यात आला आहे. पिंपरी महापालिका मुख्यालयासमोर वाहनांची तोडफोड करण्यात आली.
निगडीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पिंपरी चिंचवड महापालिकेपासून परत वळविण्यात आली आहे. दापोडी येथील चौकात वाहतूक खोळंबली आहे. तसेच उर्से टोलनाका येथे एक्सप्रेस-वेवरील एक लेन अडविण्यात आली आहे. अचानक आलेल्या दोनशे ते तीनशे भीमसैनिकांनी टोल नाक्यावर ठिय्या मांडून टोल नाका काही काळ बंद केला होता. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या प्रकाराच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यामुळे आगोदरच द्रुतगती महामार्गावर तुरळक असलेली वाहतूक अचानक ठप्प झाली होती. अति आवश्यक असेल तरच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group