पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन तब्बल दीड तासाच्या विलंबाने झाले. ११ वाजता होणारे उद्घाटन साडे बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अँक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्धघाटना दरम्यान ढिसाळ नियोजन देखील पहायला मिळाले. तर राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता.
सांगवी येथील पीडब्लूडी मैदानात दि.४ ते ८ जानेवारी दरम्यान होत असलेल्या पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला पालकमंत्री गिरीष बापट, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी सभापती सीमा सावळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, तसेच नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीने गेल्या १० वर्षापूर्वी सुरू केलेली पवनाथडी जत्रा यंदा गुंडाळण्याच्या स्थितीत होती. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी या जत्रेवर होणारा मोठा खर्च, आणि बचत गटांना अपेक्षितपणे न होणारा फायदा हे कारण देत यंदाची पवनाथडी जत्रा स्थगित करावी अशी मागणी केली होती. त्यावरून राष्ट्रवादीने जगताप यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. दरम्यान या वादात पवनाथडी जत्रेवर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र सर्व तयारी झाल्यामुळे आणि विरोधकांनी केलेली टिका पाहता ही जत्रा घेण्याचा सत्ताधारी भाजपने निर्णय घेतला. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घघाटन सोहळा संपन्न झाला. सकाळी ११ वाजता सुरू होणारे हे उद्घाटन तब्बल दीड तास उशिरा म्हणजेच १२.४५ वाजता झाले. त्याचवेळी अगदी साडेबारा वाजेपर्यंत आसनव्यवस्था लावण्याचे काम सुरू असल्यामुळे ढिसाळ नियोजनाचे दर्शन यावेळी झाले. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांच्यासह बहुतांश विरोधी नगरसेवकांनी या उद्धघाटनाकडे पाठ फिरवली.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, स्त्रियांना आज शिक्षणाची गरज आहे, त्यांना शिकविले पाहिजे. महिला केवळ घराला नाही तर देशाला शिकवतात. आज जगातल्या सर्व बँका पूर्णपणे रिफंड देत नाहीत. मात्र, बचत गट अशी संस्था आहे तिथे १०० टक्के रिफंड दिला जातो. महिलांमध्ये कौशल्य असते. परंतु, त्यांना व्यासपीठ मिळत नाही, मात्र पिंपरी महापालिकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमिकरणाचे काम सुरू केले हे कौतुकास्पद आहे.
गिरीष बापट म्हणाले, राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिकनगरी अशी देशभर ओळख आहे. महापालिकेच्या विविध योजनांमधून महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी सूचना बापट यांनी आयुक्तांना केली.
यावेळी महिला बाल कल्याण सभापती सुनिता तापकीर यांनी प्रास्ताविक केले. तर महापौर नितीन काळजे, स्थायी सभापती सीमा सावळे यांनी मनोगत केले. आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मानले.