पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भाजपमध्ये अनेक वर्षे मुंडे समर्थकांचा वरचष्मा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांतील घडामोडीत विशेषत: महापालिकेत सत्तेत आल्यानंतर मुंडे समर्थकांना पद्धतशीरपणे डावलण्यात आले आहे. अशीच भावना असलेल्या शहर भाजपच्या एका गटाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मुंडे समर्थकांवर शहरात अन्याय होतअसल्याचे सांगत माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना निश्चित झालेले पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळवून द्यावे, असे साकडे घातले. खाडे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही पंकजा यांनी शिष्टमंडळाला दिली.
पंकजा मुंडे पुण्यात आल्या असताना सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटले. नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजु दुर्गे, रघुनंदन घुले, आबा नागरगोजे यांच्यासह भाजपच्या इतर कार्यकर्त्यांचा या ७० जणांच्या शिष्टमंडळात समावेश होता. मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात होणारे कार्यक्रम काही कारणास्तव दोन वेळा लांबणीवर पडले. आता ३ फेब्रुवारीला या कार्यक्रमासाठी शहरात येण्याचे पंकजा यांनी या वेळी मान्य केले. राजु दुर्गे यांनी मुंडे समर्थकांवर अन्याय होत असल्याचे सांगत खाडे यांच्या प्राधिकरण अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला काही नको. मात्र, खाडे यांना न्याय द्या, अशी विनंती त्यांनी सर्वाच्या वतीने केली. तेव्हा खाडे यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी सर्वांना दिली.























Join Our Whatsapp Group