पिंपरी (Pclive7.com):- पतंग उडविण्यासाठीचा चीनी नायलॉन मांजा अत्यंत घातक आहे. मांजामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एक बालक आणि ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या मांजामुळे पशु-पक्षी आणि वाहनचालकांनाही दुखापत झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या या मांजावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, मकरसंक्राती सणानिमित्त शहरात पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यापूर्वीच्या काळात पतंग उडविण्यासाठी धाग्याचा वापर केला जात होता. गेल्या काही वर्षांपासून चीन मधील मांजाचा वापर वाढला आहे. नायलॉनचा हा मांजा स्वस्त असून टिकावू स्वरुपाचा आहे.
मांजा हाताने सहजासहजी तुटत नाही. पतंग उडविताना ब-याचदा हा मांजा झाडे व इमारतीमध्ये अडकला जातो. त्यातून वा-याबरोबर हा मांजा रस्त्यावर आल्यास वाहन चालकांच्या गळ्याला अडकून जीवितास धोका होऊ शकतो. या मांजामुळे दोन दिवसांपूर्वी काळेवाडी येथून नातेवाईकासोबत दुचाकीवरुन जाणा-या दोन वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. शुक्रवारी पुन्हा काळेवाडीतच दुचाकीवरुन जाणा-या एका वृद्धाच्या गळ्याला आणि हाताला मांजा लागून गंभीर दुखापत झाली आहे. याबरोबरच या मांजामुळे अनेक पशु-पक्षी जखमी झाले असून काही पक्षांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आरोग्याला घातक असलेल्या मांजा विक्रीवर पिंपरी चिंचवड शहरात त्वरित बंदी घालावी, अशी विनंती गोरखे यांनी निवेदनातून आयुक्तांना केली आहे.























Join Our Whatsapp Group