पिंपरी (Pclive7.com):- पीसीएमसी स्मार्ट सारथी आणि श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित संघवी केशरी कला आणि वाणिज्य महाविद्यालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन‘ याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी भूषविले.
योग प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ रितू सिंग यांनी विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक दबाव तसेच ताण तणाव याविषयी मार्गदर्शन केले. सध्याच्या धावपळीच्या काळात विद्यार्थी दिवसभर व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना दररोज स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळेलच असे नाही. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिक आरोग्याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे, असे सांगताना तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी करावयाचे अनेक उपायदेखील सुचविले. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करून आनंदी राहण्याचा बहुमूल्य कानमंत्र यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अभिषेक आकणकर, प्रा. प्रवीण जावीर यांनी केले. प्रा. नितीन जाबरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पीसीएमसी स्मार्ट स्मार्ट सारथीचे बिनीश सुरेंद्रन, किरण लवटे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.