पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील एक लोकप्रिय नेतृत्व संजोग भिकू वाघेरे पाटील यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर तातडीने पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक अशी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत हि अतिशय मोठी जबाबदारी असून अभ्यासपूर्वक संजोग वाघेरे पाटील यांचा या जबाबदारीसाठी विचार केलेला दिसतो. त्याची एक खास पार्श्वभूमी आहे ती यानिमित्ताने लक्षात घेतली पाहिजे.
‘संयम, संघटन, संस्कार’ असे तीन सूत्र संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाची व्याख्या करतात. अत्यंत मितभाषी, विनम्र आणि हसतमुख असे हे नेतृत्व आहे. उंच झेप घ्यायची असली तरी त्यांचे पाय हे कायम जमिनीवर असतात. कितीही व्यस्त असले, मोठ्या पदावर असले तरी सामान्य माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क तुटत नाही. ती नाळ ते घट्ट रोवून ठेवतात. बोलताना आणि वागताना अत्यंत संयमपूर्वक व्यवहार असल्याने ते माणूस म्हणून मनांत एक वेगळे स्थान निर्माण करून जातात. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर-जिल्हा अध्यक्ष अशी जबाबदारी पार पाडलेली असतानाही कुठलाही गर्व त्यांच्या वागण्यात दिसत नाही. त्यामुळेच अगदी विरोधकांनाही आपलेसे करणारे एक अजातशत्रू असे हे व्यक्तिमत्व आहे.
संयमाबरोबरच ‘संघटन’ हे त्यांच्या कार्यशैलीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संघटनेतील पदाधिकारी ते थेट सामान्य कार्यकर्ता असा सुसंवाद ठेवण्यात त्यांचा हातखंड आहे. संघटनेतील कुठल्याही व्यक्तीला त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो आणि विशेष म्हणजे आपली बाजू, भूमिका आणि विचार मोकळेपणाने मांडता येतात. प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याकडे त्यांचा कल असतो. पक्षाच्या हिताचे असेल तर तशी सूचना कुणाकडूनही आली तरी तिचा ते खुलेपणाने स्वीकार करताना दिसतात. संघटनेसमोर एक उद्दिष्ट ठेवून, सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्याची सचोटी त्यांच्याकडे आहे.
संस्कार हि त्यांच्या व्यक्तिमत्वाची तिसरी जमेची बाजू आहे. त्यांचे वडील कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या समाजकार्याचा वारसा ते वसा म्हणून समर्थपणे पुढे घेऊन जाताना दिसतात. सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्रत्येक प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावणे असा त्यांचा कयास असतो. माणुसकी आणि नीतीमूल्य यांना ते सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यामुळेच आजवर त्यांच्या घराण्यात सरपंच, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्वपूर्ण पदे आलेली असतानाही आजवर एकही भ्रष्टाचाराचा आणि गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतही हेच संस्कार दिसून येतात.
येत्या काही दिवसातच लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यात महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत मावळ लोकसभा मतदारसंघातुन त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर त्यांच्या नेतृत्वाची हि त्रिसूत्री विरोधी उमेदवारावर नक्कीच भारी पडू शकते अशी जनमानसात चर्चा आहे.