पिंपरी (Pclive7.com):- अधिकृत नळजोडग्राहक असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ६ हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा तसेच पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ करण्याचा तुघलकी निर्णय स्थायी समितीने घेतला. या निर्णयामुळे करदात्यांना मोठा आर्थिंक भुर्दंड सोसावा लागणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून नागरिकांना वाढीव पाणीपट्टीची झळ बसणार आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यावर स्थायी समितीत चर्चा झाली. पाणीपट्टीचे प्रस्तावित दर अधिक असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. परंतु, पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. परंतु, पाच टक्के दरवाढ करण्याला शिवसेना नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीच्या राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला.
सभापती सीमा सावळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक १०९ कोटी रुपयांचा खर्च येतो. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या धरणातून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा करणे, मीटर रीडिंगनुसार पाण्याचे बिल तयार करणे, त्याचे वाटप करणे या सर्व प्रक्रियेवर हा खर्च होतो. एकीकडे १०९ कोटींचा खर्च होत असताना नागरिकांनी वार्षिक ३४ कोटी रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, ही प्रशासनाची मागणी असते. परंतु, त्यातील अवघ्या २५ ते २६ कोटी रुपयांचीच वसुली होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक ८० ते ८५ कोटी रुपयांचा बोजा पडतो. अखेरिस, प्रति कुटुंबाला दरमहा सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे मीटर रिडींगप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी करण्यासाठी प्रति कुटुंब प्रतिमहिना १०० रुपये, झोपडपट्टीतील प्रति नळजोडासाठी महिना ५० रुपये दर आकारण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना प्रति एक हजार लिटरसाठी ५० रुपये, खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन्स, रुग्णालये आणि वसतीगृहांना प्रति एक हजार लिटरसाठी १५ रुपये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्तांची मान्यता आणि ना नफा ना तोटा या तत्त्वावरील मंडळे तसेच महापालिकेच्या इमारतींना प्रति १ हजार लिटरसाठी १० रुपये आणि स्टेडियमला प्रति १ हजार लिटरसाठी २० रुपये दर आकारण्याचे आयुक्तांकडून प्रस्तावित करण्यात आले होते. या दरामध्ये स्थायी समितीने कोणतेही बदल केलेले नाहीत, असे सीमा सावळे यांनी सांगितले.
नवीन दरपत्रक
सहा हजार ते १५ हजार लिटर पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे आठ रुपये, १५ हजार ते २२ हजार ५०० लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे साडेबारा रुपये, २२ हजार ५०१ ते ३० हजार लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति एक हजार लिटरमागे २० रुपये आणि ३० हजार १ लिटरच्या पुढे पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे ३५ रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. याचा मोठा भुर्दंड करदात्यांना सोसावा लागणार आहे.






















Join Our Whatsapp Group