पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. ही गावे कोणत्याही सुविधांपासून वंचित राहणार नाही. कोणत्याही प्रकारचे आरोप करताना पुरावासहित सादर करा, विकासाचे ‘राजकारण’ करु नका, असे मत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे आज व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर २० वर्षांपासून अन्याय होत होता. तो अन्याय दूर करण्याचा ‘शब्द’ या परिसरातील नागरिकांना मी दिला होता. तो पाळला असून या भागात रस्त्यांची कामे सुरु होत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. आगामी काळात पालिकेतील या समाविष्ट गावांत रस्ते, मुबलक पाणी, उड्डाण पूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित करण्यावर माझा भर असणार आहे. शहराच्या इतर परिसराचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच पद्धतीने समाविष्ट गावाचा विकास करुन गावाचा कायापालाट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
समाविष्ट गावातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे आज आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कामांमध्ये मोशी येथील गट क्रमांक ५७ ते ६१ पर्यंतचा १८ मीटर डीपी रस्ता, शिवाजीवाडी ते मोशी, मोशी आळंदी रस्ता ते इंद्रायणी नदी (केळगावपुलापर्यंतचा) १८ डीपी रस्ता डुडुळगाव, च-होली पठारे मळा, डी वाय पाटील कॉलेज विकास आराखड्यातील ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे उर्वरित (पूर्व पठारे मळा, च-होली) च-होली मुख्य रस्ता, दाभाडे वस्ती ते इंद्रायणी नदीपर्यंतचा ४५ मीटर रुंद रस्ता, पुणे आळंदी रस्ता ते दाभाडे वस्ती येथील ३० ते ४५ मीटर डीपी रस्ता विकसित करणे आझादनगर च-होली या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, सारंग कामतेकर, भीमा फुगे नगरसेविका सुवर्णा बुर्डे, ई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ”महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यांना विविध सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले. त्यांच्याकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिले गेले. मी आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत समाविष्ट गावातील विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावातील नागरिक भाजपच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना आम्ही गावांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, मी, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार आम्ही सर्वांनी समाविष्ट गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे”. तसेच कचरा डेपो, शहराचा विकास आदींबाबत त्यांनी भाष्य केले.
”समाविष्ट गावात ४२५ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपने समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले.
आताच्या पाच वर्षाचा शहराचा विकास व मागील २० वर्षाचा शहराचा विकास कसा झाला हे नागरिकांनीच तपासून पहावे. कोणत्याही विषयात विकासाच राजकारण करु नका. समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे पहा. ”शहराचा इतर भागात चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच धर्तीवर समाविष्ट गावांत प्रशस्त रस्ते करण्यात येत आहेत. उद्याने, क्रीडांगणे, मुलबक पाण्याची सोय करण्यात येणार आहे. समाविष्ट गावातील चांगला विकास होऊन नागरिकरण वाढेल. मोठ-मोठे प्रकल्प येतील. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. भाजपचा अजेंडा विकास कामांचा आहे. त्यानुसार पक्षाने विकास कामे सुरु केली आहेत. सत्तेच्या माध्यमातून आम्ही जनसेवा करत आहोत”, असेही आमदार लांडगे म्हणाले.
महापौर नितीन काळजे म्हणाले, ”पालिकेतील समाविष्ट गावात २० वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाचा विकास होत आहे. रस्ते झाल्यावर शेतक-यांना मोठा फायदा होईल. हे रस्ते करत असताना गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे”.