पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय अग्निशमनदिनी अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख मनोज लोणकर यांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. संत तुकारामनगर येथील महापालिका मुख्य अग्निशमन केंद्राच्या आवारात असलेल्या शहीद स्मृती स्तंभासमोर अभिवादन समारंभ पार पडला.
यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुंबई येथील व्हिक्टोरिया बंदरामधील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ६६ अग्निशमन जवानांना, तसेच १ डिसेंबर, २०१९ ला दापोडीत २५ फूट खड्ड्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करताना हुतात्मा झालेल्या फायरमेन विशाल जाधव यांना अभिवादन करण्यात आले.
या शहिदांच्या पराक्रमाची आठवण व्हावी, म्हणून दरवर्षी १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन दिन पाळला जातो, तसेच अग्निशमन विभागामार्फत १४ ते २० एप्रिलच्या दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहादरम्यान शहरात विविध ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांद्वारे प्रत्यक्ष मॉकड्रिल, अग्निशमन प्रशिक्षण व प्रात्यक्षिके वर्ग आयोजित करण्यात आली आहेत.