पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगाराला मोठा फटका बसत आहे. बेरोजगारांच्या विषयी शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गुरूवारी दि.८ रोजी प्राधिकरण येथील तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी याबाबत माहिती दिली.
विशाल वाकडकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही उद्योगनगरी अशी होती. मात्र स्वार्थी व आत्मकेंद्री सत्ताधारी नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योगनगरीला आता घरघर लागली आहे. परिणामी, लाखो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगारांच्या विषयी शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि.८ रोजी सकाळी १०.३० वाजता भोसरीतील लांडेवाडी चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होणार आहे. हा मोर्चा आकुर्डी प्राधिकरण येथील तहसीलदार कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे वाकडकर म्हणाले. या मोर्चात राष्ट्रवादीच्या सर्व आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group