पिंपरी (Pclive7.com):- केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. आता त्यांना त्यांचा विसर पडलायं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जनतेला केवळ आश्वासनांची ‘गाजरं’ दिली होती. त्याचाच निषेध म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज ‘गाजर डे’ साजरा केला असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले.
पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारच्या निषेधार्थ ‘गाजर डे’ साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, निकीता कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक पंकज भालेकर, फजल शेख, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, विशाल काळभोर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, सागर तापकीर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपने सत्तेेत येण्यापूर्वी अनेक खोट्या घोषणांची ‘गाजरं’ या जनतेला दाखवली होती. तरूणांना नोकरी असेल, किंवा व्यापार्यांचा रोजगार, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांनाच खोटी आश्वासन दिली होती. पिंपरी चिंचवडबाबत बोलायचं म्हटलं तर मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचं या भाजप सरकारनं ‘गाजरचं’ दाखवलयं, रिंगरोडच्या बाबतीतही भाजपवाल्यांनी गरिब जनतेची फसवणूकच केली. अनधिकृत बांधकामांचा प्रशेन तर १०० दिवसांत सोडवू असं ‘गाजरचं’ दाखवलं होतं. शास्तीकराचा तर या सत्तेत मस्त झालेल्या भाजपच्या मंडळींना विसरच पडलायं. पाणी फुकट देणार असं ‘गाजर’ दाखवून तिप्पट पाणीकर महापालिकेतील पदाधिकार्यांनी वाढवण्याचा घाट घातलायं. सत्तेत येऊन या भाजपच्या मंडळींनी केवळ आश्वासनांची ‘गाजरचं’ दिली आहेत. खोट्या घोषणांचा केवळ पाऊस पाडलायं म्हणून आज राष्ट्रवादीने या फसव्या सत्ताधार्यांचा निषेध करण्यासाठी ‘गाजर डे’ साजरा केला असल्याचे ते म्हणाले.