पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या २ सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल २१ नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये दोन माजी महापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व सदस्यांचाही समावेश आहे.
स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्या ८ सदस्यांची नावे चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आली. त्यात भाजपचे विद्यमान सभापती सीमा सावळे यांच्यासह ६ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ सदस्यांची नावे आल्याने ते निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादीचे वैशाली काळभोर व अनुराधा गोफणे या दोघी सदस्या बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी सदस्य म्हणून इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून राष्ट्रवादीने १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले होते.
त्यास तब्बल २१ नगरसेवकांनी प्रतिसाद देत सदस्यपदासाठी दावेदारी केली आहे. त्यात माजी महापौर अपर्णा डोके व डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे तसेच माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे व विनोद नढे, जावेद शेख, राजू बनसोडे, संतोष कोकणे, रोहित काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, राहुल भोसले, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, निकिता कदम, स्वाती काटेे, विनया तापकीर, उषा काळे, संगीता ताम्हाणे यांचा समावेश आहे. यापैकी केवळ दोन नगरसेवकांची नावे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने मंगळवारी (दि.२०) रोजी होणार्या सर्वसाधारण सभेत सादर केली जातील, असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.
दरम्यान, सत्तारूढ भाजपच्या वतीने चिठ्ठीतून निवृत्त झालेल्या समिती अध्यक्षा सीमा सावळे, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड, उषा मुंढे, कोमल मेवानी,आशा शेंडगे यांच्या जागी ६ जणांची नावे सर्वसाधारण सभेत सादर केली जाणार आहेत. इच्छुक नगरसेवकांकडून भाजपने अर्ज मागविले नाहीत. पक्षाच्या कोअर कमिटीच्या सहमतीने ही नावे निश्चित केली जाणार आहेत.



















Join Our Whatsapp Group