रहाटणी (Pclive7.com):- रहाटणी येथील पदवीधर युवक धावपटू शिवाजी बळीराम खुळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ स्पर्धेत यश मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी ही स्पर्धा डर्बन येथे ९ जून रोजी पार पडली.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240616-WA0027-300x188.jpg)
या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधून १३ धावपटूंनी – सहभाग घेतला होता. शिवाजी खुळे यांनी ८५.०९ कि.मी ११ तास ५३ मिनीटे २४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दक्षिण अफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरादरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. पदक जिंकण्यासाठी १२ तासांत स्पर्धा पूर्ण करण्याचे टार्गेट असते. या शर्यतीसाठी खुळे यांना त्यांचे मार्गदर्शक ऑर्यन मॅन सचिन वाकडकर, तसेच ही शर्यत जिंकलेले पांडुरंग बोडके आणि ट्रेनिंग कोच शिव यादव यांनीही सहकार्य केले. कॉम्रेड मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिका येथील डर्बन येथील जगातील जुनी १०० वर्षापासून चालू आणि डोंगर माथ्यावरील अतिशय खडतर अशी मॅरेथॉन स्पर्धा शिवाजी खुळे यांनी पूर्ण केल्याबद्दल रहाटणी, काळेवाडीकरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शिवाजी खुळे हे मागील ४ ते ५ वर्षापासून धावण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी केलेली ही कामगिरी तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या जिद्दीचे, अथक प्रयत्नांचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या या यशस्वी धावण्यामुळे गावाचा आणि देशाचा अभिमान वाढला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व बंधू नरेश खुळे यांनी व्यक्त केले आहे.