पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बालवाडीतील विद्यार्थ्यांना स्वच्छता किट वाटप केले जात आहेत. त्यामध्ये पक्षीय भेदाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे.
नगरसेविका शिलवंत-धर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात हा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शहरातील महापालिकेच्या बालवाडीतील मुलांना त्यांच्या स्वच्छतेविषयी आवड निर्माण व्हावी, म्हणून महिला बालकल्याण समितीत मी स्वत: या संबंधी ठराव मंजूर करून घेतला होता. सभापतींनी देखील ठरावाला मंजूरी देत प्रभागातील सर्व पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन किटचे वाटप करा असा संबंधित अधिकार्यांना आदेश दिला होता. मात्र प्रभाग क्रमांक २० मधील संत तुकारामनगर भागात या किटच्या वाटपाचा कार्यक्रम शिक्षण विभागाने परस्पर घेतला. त्यासाठी प्रभागातील राष्ट्रवादीच्या तिन्ही नगरसेवकांना कोणतीही सूचना न देता डावलण्यात आले. स्थानिक भाजप नगरसेविकेच्या सोयीनुसार कार्यक्रम घेतले जातात. समाजउपयोगी विषय राष्ट्रवादीने सुचवायचे, आणि श्रेय मात्र भाजपाने घ्यायचे असा प्रकार चालू आहे. महापालिका अधिकारी, कर्मचारी भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागतात. यापूर्वी देखील महापालिकेच्यावतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात असाच प्रकार घडला होता. सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडून विरोधी नगरसेवकांना अवमानाची वागणूक दिली जात आहे. या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group