पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा ‘व्हिजन २०-२०′ ला समरुप आहे. या अर्थसंकल्पात ‘व्हिजन २०-२०′ मधील कामांना चालना दिली आहे. समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. आरक्षणे विकसित केली जाणार असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होलीतील गृहप्रकल्पाच्या कामांना प्राध्यान्य दिले असून ही कामे २०२० पर्यंत पुर्ण होणार आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तसेच भाजपने महापालिका निवडणुकीवेळी दिलेली आश्वासाने पुर्ण करण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले. या अर्थसंल्पामुळे व्हिजन २०२० पुर्ण होण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीअगोदर ‘व्हिजन २०-२०′ अंतर्गत विकास कामे करण्याचा संकल्प केला होता. २०२० पर्यंत भोसरी मतदार संघाचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने भाजपने विकास कामे सुरु केली आहेत. ‘व्हिजन २०-२०′ मधील कामे पालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पांमध्ये समाविष्ट केली असून त्यासाठी मोठी तरतूद केली आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी ‘व्हिजन २०-२०’ मिशन सुरु केले. गेल्या ३५ वर्षाच्या इतिहासात समाविष्ट गावाला न्याय मिळाला नव्हता. परंतु, भाजपने समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. समाविष्ट गावात ४०५ कोटी रुपयांच्या खर्चाची रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. आरक्षण ताब्यात घेतली असून विकसीत करण्यात येत आहे.
च-होलीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ हजार ४४२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले आहेत. त्याला मंजूरी मिळून लवकरच त्याचे काम सुरु होईल. बो-हाडेवाडी, दिघी, डुडुळगाव, चोवीसवाडी येथे देखील आवास योजना राबविण्यात येणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’चा प्रकल्प देखील स्थायी समितीसमोर असून त्याचे काम देखील लवकरच सुरु होणार आहे. ही सर्व कामे २०२० पर्यंत पुर्ण केली जाणार आहेत, असे आमदार लांडगे यांनी सांगितले. तसेच शहरवासियांची तहान भागविण्यासाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणले जाणार आहे. त्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमला असून त्याचे कामही लवकर मार्गी लागेल.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी लागणारी जागा पालिकेने ताब्यात घेतली असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. जागा ताब्यात घेत असताना कोणावर अन्याय होऊ नये. याची दक्षता घेतली जात आहे. लवकरच या महामार्गाचे देखील कामाला सुरुवात होईल, असेही लांडगे यांनी सांगितले आहे.
नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. अमृत योजनेअंतर्गत संपू्र्ण शहरात २४x७ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखड्याच्या अमंजलबजावणीसाठी मोठी तरतूद ठेवली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध नवीन योजना सुरु केल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले. तसेच नियोजनपुर्वक विकास कामे केल्याबद्दल महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळात शहरात आणखीन भरीव विकास कामे आम्ही करणार आहोत.
शहरातील काही प्रलंबित प्रश्नासंदर्भात मी आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. लवकरच तेही प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.