पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या विद्यमान सभापती सीमा सावळे यांच्यासह भाजपचे ६ सदस्य लॉटरी प्रक्रियेतून बाहेर पडले. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी सत्ताधारी भाजपात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि खासदार अमर साबळे यांच्या गटाकडून आपल्याच हे पद मिळावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरदेखील फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. सभापती पदासाठी आमदार लांडगे गटाचे नगरसेवक राहुल जाधव, जगताप गटाचे शीतल शिंदे, तसेच तीनही गटाशी सौख्य असलेले संदीप वाघेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका नगरसेवकाने तर पालकमंत्री गिरीष बापट आणि खासदार साबळे यांच्याकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली असल्याची चर्चा आहे.
स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या तिजोरीची चावी असते. त्यामुळे या समितीच्या सभापतीपदासाठी इच्छुकांनी जोरदार दबावगट निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एका इच्छुकाने तर पक्षाच्या एका खासदाराकडे अर्थपूर्ण फिल्डिंग लावल्याची चर्चादेखील महापालिका वर्तुळात जोरदार सुरु आहे. हा इच्छुक संबंधित खासदाराच्या जवळचा मानला जातो, तसेच तो ‘दादा-भाऊ’ यांनाही आपण तुमचाच असल्याचे सांगत आहे, त्यामुळे या दबावतंत्राबद्दल सद्या महापालिकेत विविधांगी चर्चा सुरु झाली आहे. स्थायी समितीत वर्णी लावावी, यासाठी भाजपमध्ये किमान ३० ते ४० नगरसेवक इच्छुक आहेत. तर सभापतीपदासाठी राहुल जाधव, शीतल शिंदे, संदीप वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक नामदेव ढाके यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. तथापि, या चौघांपैकी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदेशीर ठरेल, अशा वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सभापतीपदासाठी अनेक इच्छुक असले तरी, या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.






















Join Our Whatsapp Group