पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता नेत्यांच्या कामगिरीमुळे आली हे जरी सत्य असले तरी त्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. ‘नको भानामती, नको बारामती’ असे म्हणत भाजपने सोशल मीडियावर निवडणुकीपूर्वी धुमाकूळ घातला होता. पण त्याच भाजपला आता राष्ट्रवादीने त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरवले आहे. म्हणूनच भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभारावर नेमक्या शब्दात घाव घालण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मिडियावर टिका करणारी पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय आहे. यात शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडावर फुल्या मारत भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराचे वाभाडे काढत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात ‘रणशिंग’ फुंकले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. मात्र निवडणुकीपूर्वीच पवारांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे शिलेदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे भाजपाच्या गोठात गेले. त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले आझम पानसरे यांनीही अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपात प्रवेश केला. मग काय अर्ध्याहून अधिक राष्ट्रवादी भाजपात गेल्याने पवारांची ताकद मर्यादित झाली होती.
प्रचारा दरम्यानही राष्ट्रवादीची ताकद कमकुवतच दिसून येत होती. १५ वर्षात सत्तेच्या माध्यमातून शहराचा केलेला विकास राष्ट्रवादी जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत होती. तर दुसरीकडे भाजपने अक्षरश: राष्ट्रवादीवर ‘हल्लाबोल’ चढवला होता. ‘नको भानामती, नको बारामती’च्या घोषणेचे फलकही शहरभर लावले होते. महापालिकेत केलेल्या कामांमध्ये राष्ट्रवादीने मोठा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांनी सोशल मिडीयावरून सडकून टिका केली होती. परिणामी या पोस्टरबाजी, तसेच सोशल मिडीयावरील टिकेचाच एक भाग म्हणजे राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले असल्याचे सत्य कालांतराने समोर आले.
आता महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपची वर्षपूर्ती नुकतीच झाली. गेल्या वर्षभराचा कारभार राजकीय तज्ञ मंडळींच्या मते असमाधानकारकच झाला आहे. वर्षभर स्थायीच्या कारभारावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. निवडणुकीपूर्वी शहरवासियांना केलेल्या घोषणा हवेतच राहिल्यात. शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शास्तीकर प्रलंबित आहे. रिंगरोडचा मुद्दा ऐंरणीवर आहे. शहरवासियांचे पाणी महाग करण्याचा घाट सत्ताधारी घालत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. एकंदरच अनेक प्रश्नावरून भाजपला खिंडीत पकडण्याची राष्ट्रवादीला संधी मिळाली आहे. म्हणूनच शहरातील राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्याचे तोंडावर लाल रंगात फुल्या असलेले पोस्टर बनविण्यात आले आहे. तसेच त्यावर लिहण्यात आलेय की, शू sssss, काही बोलायचे नाही… सरकार पारदर्शक आहे.. या पोस्टवर शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, जेष्ठनेते भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे यांचे फोटो वापरण्यात आलेत.
राष्ट्रवादीच्या या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे भाजपचे नेते पुरते घायाळ होणार अाहेत. आता राष्ट्रवादीच्या या वाराला भाजप कसा सामोरे जातोय हे पहाणं उत्सुकतेचे ठरणार आहे.