पुणे (Pclive7.com):- पुणे महापालिका हद्दीतील हिंगणे खुर्द, कोंढवा बुद्रुक, महात्मा फुले पेठ, कोरेगाव पार्क, श्री संत गाडगे महाराज वस्ती, राजीव गांधी नगर आणि वडगाव बुद्रुक येथील झोपडपट्टीधारकांवर महापालिकेने कारवाई करून त्यांना बेघर केले. बेघर झालेल्या नागरिकांना एसआरए किंवा बीएसयुपी योजनेअंतर्गत त्वरीत घरे द्यावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीवासियांनी महापालिकेसमोर स्वयंपाक करून आंदोलन केले. पालिकेने बेघर झालेल्यांना हक्काची घरे न दिल्यास आयुक्तांना साडी-चोळी आणि बांगड्या भेट देण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलक महिलांनी पालिकेसमोरील रस्त्यावर जागोजागी चुली मांडून त्यावर भाकरी, भाजी तयार करत स्वयंपाक करून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे पालिकेसमोरून स.गो. बर्वे चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.
ग्रामपंचायत असल्यापासून हिंगणे खुर्द येथे राहात असलेल्या झोपडपट्टीधारकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून बेघर केले आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत या नागरिकांना एसआरए आणि बीएसयुपी योजनेंतर्गत घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत.
तसेच कोंढवा बुद्रुक येथील स.नं. ४७ मध्ये गेल्या दहा वर्षापासून वास्तव्यास असणार्या नागरिकांना अतिक्रमण विभागाने कोणतीही नोटीस न देता बेघर केले. त्यांनाही बीएसयुपी योजनेंतर्गत घरे देण्याचे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते, प्रत्यक्षात मात्र काहीच दिले नाही. म्हणून हे आंदोलन करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group