पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९५ हजार २९७ बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले.
या लसीकरण मोहिमेचे आयोजन रविवारी दि.११ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर नितीन काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले. महापालिका परिसरात ८५५ लसीकरण केंद्रांमार्फत ८ प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि ५३ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २७३४ लसीकरण कर्मचारी नेमून करण्यात आली होती.
यावेळी सर्व महापालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टी अंगणवाडी अशा ८५५ ठिकाणी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३१ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ५८ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली होती.
मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी व इतर स्वयंसेवकांनी सहकार्य केले. तसेच नगरसेवक, रोटरी क्लबचे प्रांतपाल, डॉ. एस. के. जैन व सर्व रोटरी क्लब अध्यक्ष, पदाधिकारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी, बालवाडी शिक्षिका, बचतगट, अंगणवाडी सेविका, मदतनिस या सर्वांचे सहकार्य मिळाले. ज्या ५ वर्षांखालील बालकांना अजूनही पोलिओ लसीकरण करण्यात आले नाही, त्यांना घरी येणा-या कर्मचा-यांकडून लसीकरण करुन घेण्याचे आवाहन महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.