पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डनचे काम सुरू आहे. या गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले सन डायल प्लाझा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पिंपळे सौदागर येथे लिनिअर गार्डनमध्ये राज्यातील प्रथमच ‘सन डायल प्लाझा’ विकसित केले जात आहे. जमिनीला समांतर अशा घड्याळाची प्रतिमा तयार करून मध्यभागी व्यक्ती उभी राहिली असता सूर्याची किरणे त्यावर पडून त्या व्यक्तीची सावली खाली घडयाळाच्या ज्या अंकावर पडते त्यानुसार वेळेचा अंदाज येतो. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतो त्याप्रमाणे प्रतिमेच्या सावलीवरून वेळेचे आकलन करता येते, अशी या सन डायलची रचना असणार आहे. अशी संकल्पना साकारणारे पिंपळे सौदागरमधील लिनिअर अर्बन गार्डन महाराष्ट्र राज्यातील पहिलेच उद्यान आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी हे सन डायल प्लाझा एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तसेच लिनियर गार्डनमध्ये साकारण्यात येणा-या अॅम्पिथिएटर आणि स्केटिंग प्लाझा या वास्तूंविषयीही माहिती दिली आहे. अॅम्पिथिएटर म्हणजे ओपन रंगमंदिर असते. हे अंडाकृती असून केंद्रस्थानी जागा मोकळी असते आणि बाजूने नागरिकांना बैठक व्यवस्था केलेली असते. या अॅम्पिथिएटरचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून करण्यात येईल. तर प्रभागातील इच्छुक नागरिकांना स्केटिंगचा लाभ घेता यावा यासाठी या उद्यानात स्केटिंग प्लाझा विकसित करण्यात येणार आहे.
पिंपळेसौदागर हा शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या भागात देशातील कानाकोप-यातून आलेले नागरिक राहतात. या भागातील प्रशस्त रस्ते, सोयीसुविधांचा शहराच्या अन्य भागातील नागरिकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित असलेले हे पर्यावरणपूरक उद्यान आपले ड्रीम प्रोजेक्ट असून सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. तसेच या उद्यानाचे काम वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर ते नागरिकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही काटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.
या संदर्भात नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या की, या उद्यानात सुविधांव्यतिरिक्त महिलांच्या सुरक्षिततेलाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी आवश्यक त्यासर्व गोष्टींचा समावेश या गार्डनमध्ये करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group