पिंपरी (Pclive7.com):- विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा आमदार असणाऱ्या पिंपरी विधानसभेवर महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजपने दावा केला आहे. भाजपच्या आमदार आणि पदाधिकारी यांनी बैठक घेऊन पिंपरीवर दावा केला आहे.

मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माउली थोरात, प्रवक्ते राजू दुर्गे, संजय मंगोडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

सदाशिव खाडे म्हणाले, पिंपरीत कमळावर मतदान करायची संधी मिळावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही. राजू दुर्गे म्हणाले, आम्हाला काही झाले तरी कमळ चिन्ह द्यावे हा आग्रह सर्वांनी धरला. लोकसभेला आम्हाला कमळ चिन्ह नाही दिले. आतासुद्धा ते नसेल तर आता काम करून उपयोग काय?
पिंपरी मतदारसंघात भाजपचे अमर साबळे यांचा निसटता पराभव झाला. नंतर हा आरपीआयला सुटला. भाजपची ताकद आता दुप्पट झाली आहे. येथे भाजपचे आता १४ नगरसेवक आहेत. लोकसभेला खासदारांना १७ हजारांची आघाडी दिली. भाजपच्याच कार्यकर्त्याला इथे संधी द्यावी.– उमा खापरे, आमदार
पिंपरी मतदारसंघात भाजपची ताकद आहे. संघटन आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.– अमित गोरखे, आमदार
Tags: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसपिंपरी विधानसभाभाजपाराष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावाविधानसभा निवडणूक