पिंपरी (Pclive7.com):- पत्नीला वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सावत्र सासऱ्यानेही पिडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कासारवाडी येथे घडली.

याबाबत ३२ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.२०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिडित महिलेचा पती व सावत्र सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ मार्च २०२२ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत कासारवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी यांना एक अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर पिडित महिलेच्या मोबाइलवर एका ग्राहकाने संपर्क केला असता आरोपीने पिडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पाठविले. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला. पिडित महिलेने आरोपींना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली. तसेच आरोपी सावत्र सासरा यानेही पिडित महिलेच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group