भोसरी (Pclive7.com):- चिखली, मोरेवस्ती येथील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसात हे रस्ते अक्षरशः उखडून निघाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे, कि मोरेवस्तीतील अंगणवाडी रस्ता, वाघू साने चौक, चिंचेचा मळा रस्ता, साने चौक ते चिखली या दरम्यानचा मुख्य रस्ता तसेच बहुतांशी अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याखालून जाणाऱ्या भूमिगत सांडपाणी वाहिनीच्या चेंबरची झाकणे खाली गेली आहेत. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनांची टायर खड्डयात अडकून अपघात होत आहेत. ताम्हणे वस्ती येथे चेंबरमधील खड्डयात चाक अडकल्याने चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. तसेच मोरे वस्ती अंगणवाडी रस्त्यावर खड्डयात पडून अनेक दुचाकी चालक जखमी झाले आहेत.
रस्त्यांची अशा प्रकारची दुर्दशा झाली असताना प्रशासन नेमके काय करत आहे असा प्रश्न आहे. या कामाची गुणवत्ता एका पावसातच उखडून निघते म्हणजे कामाच्या गुणवत्तेत नक्कीच तडजोड करण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. या कामासाठी कोणत्या ठेकेदाराला नियुक्त करण्यात आले. त्यांनी कामाचे दर काय होते. एका पावसात रस्त्याची दुर्दशा होते या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे असे देखील उबाळे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे रस्ते म्हणजे करदात्या नागरिकांना वेठीला धरण्याचा प्रकार आहे असे देखील त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अशा निकृष्ट दर्जाच्या कामांची तातडीने चौकशी करण्यात यावी संबंधित ठेकेदाराला याबाबत नोटीस बजावून ब्लॅकलिस्टेड करावे असे देखील उबाळे यांनी म्हटले आहे.