पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संस्कृती विविध परंपरांनी नटलेली आहे. भारतीयांनी ही या संस्कृती व परंपरांचे जतन व संवर्धन केल्याने युगानुयुगे या परंपरा टिकून आहेत. सर्वांना सोबत घेऊन सामूहिकता, एकता व समतेचे संस्कार आपोआप मनात रुजविणारा लोकोत्सव म्हणजे नवरात्रात खेळला जाणारा भोंडला व गरबा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शाळेचे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोंडला, दांडिया व गरबा आयोजित करण्यात आला. या विशेष प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून भोंडला, गरबा व दांडिया नृत्याचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संचालक ह.भ.प राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ .ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार व समन्वयिका मयुरी मुळूक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, हत्ती ( हादगा) व दुर्गा मातेच्या पुजनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुंदर गरबा नृत्य सादर करून शाळेत एकात्मता आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली. कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे दांडिया नृत्यात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांनीही सहभाग घेतला आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले. नृत्याबरोबरच देवीच्या भक्तिमय गीतांनी संतपीठ परिसर भक्तिमय झाला.

समारोपाच्या वेळी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांनी सर्वांचे अभिनंदन करून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले व आपली संस्कृती व परंपरा जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षिका नेहा नाफडे यांनी केले व आभार प्रदर्शन संगीत शिक्षक विवेक भालेराव यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group