जलकुंभातून थेट सोसायटीच्या टाकीला पाणी; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
भोसरी (Pclive7.com):- चऱ्होली येथील प्राईड वर्ल्ड सिटीसह अन्य सोसायटींचा पाणी पुरवठा सक्षम होणार असून, महानगरपालिकेच्या जलकुंभातून थेट सोसायटीच्या अंडरग्राउंड वॉटर टँकला पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून मिळाली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून चऱ्होली आणि परिसरातील सोसायटींना पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. पूर्वी टाकलेल्या जुन्या जलवाहिनीद्वारे प्राईड वर्ल्ड सिटी, ब्रॉकलिन, लॉग हेडलाईन, किंग्ज बेरी, मेन हायटेन अशा सोसायटींना कमी दाबाने पाणी पुरवठाची समस्या आहे.

सुमारे ४ हजार सदनिकाधारका आणि २० हजार लोकवस्ती असलेल्या या भागात पाणी पुरवठा सुमारे १ किलोमीटर लांब असलेल्या जलकुंभातून केला जात आहे. सदर पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला असून त्याला यश मिळाले.
दरम्यान, महानगरपालिका पाणी पुरवठा प्रशासनाने थेट सोसायटींच्या टाकीमध्ये पाणी पुरवठा व्हावा. या करिता इंटरलाईन कनेक्शन व नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. त्याचे दोन-तीन दिवसांत टेस्टिंग होणार असून, त्यानंतर नवीन जलवाहिनी कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. त्यामुळे प्राईड वर्ल्ड सिटीसह अन्य सोसायटींचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
समाविष्ट गावांमध्ये वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याच्या तुलनेमध्ये जुन्या जलवाहिनी बदलून नवीन टाकण्याचे काम प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. कारण, जुन्या जलवाहिन्यांची क्षमता, पाणी गळती आणि दुरस्ती याबाबत अनेक तक्रारी येतात. प्राईड वर्ल्ड सिटी सोसायटीसह लगतच्या भागातील गृहप्रकल्पांना दुसऱ्या टाकीतून पाणी पंपिंग करावे लागत होते. आता थेट सोसायटीच्या टाकीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे प्राणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





















Join Our Whatsapp Group