पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याची बाब पक्षाकडून उघड केली जात नव्हती. परंतु, त्यांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी (दि.९) मंजूर केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागल्यानंतर आमदार महेश लांडगे गटातून जाधव स्थायी अध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र, त्यांना डावलून अध्यक्षपद आमदार लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांना देण्यात आले. त्यानंतर भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनीही राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, पुढील सदस्य निवडीत आमदार लांडगे गटाला झुकते माप दिल्याने हे राजीनामा नाट्य संपुष्टात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा जाधव यांनी आपल्या स्थायी सदस्यपदाचा राजीनामा महापौर व पक्षनेत्यांकडे सुपूर्द केला होता. महिनाभर या राजीनाम्याबाबत पक्षातील पदाधिकारी काही बोलायला तयार नव्हते. मात्र, अचानकपणे सोमवारी हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group