पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी शहरात सर्वत्र नागरिकांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक मीनल यादव, सचिन भोसले, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते. बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनाधिकृत बांधकामाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनधिकृत बांधकामांना महापालिका मिळकत कराच्या दुपटीने शास्तीकर लावते थकीत असलेला शास्तीकर संपुर्ण भरल्या शिवाय मिळकत कर भरून घेतला जात नाही. सरकारच्या निर्णयाचे घोडे आडले असताना नागरीक मिळकत कर विभागाकडून होणा-या शास्तीकराच्या जाचामुळे पूर्णतः हैराण झाले आहेत. शास्तीकराची रक्कम न भरल्याने काही मिळकती महापालिका करसंकलन विभागाच्यावतीने जप्तही केल्या आहेत.
अनाधिकृत बांधकामे नियमीत व्हावी व शास्तीकर पूर्णतः माफ केला जावा या करता शिवसेना पहिल्या पासून आग्रही आहे. शिवसेनेच्या वतीने या मागणी साठी अनेक वेळा मोर्चा काढले, आंदोलन केले, मुख्यमंत्र्यांना भेटून अनेक वेळा मागणीही केली. परंतु, आजपर्यंत पिंपरी चिंचवडकरांना आश्वासना पलीकडे काहीच मिळाले नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला गेला परंतु त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही झाला नाही. ज्या व्यावसायिकांनी अनधिकृतपणे इमारती उभ्या केल्या. त्यांना मात्र याचा लाभ मिळाला. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शर्ती व दंड एवढा जाचक आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक अर्ज करण्यास धजावत नाही. अनधिकृत बाधकामे नियमीतीकरणाचा आदेश हा केवळ कागदवरच राहीला असून त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य मिळकतधारकांना झाला नाही.
या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शहभर शास्तीकर विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात शास्तीकर माफीचा आदेश राज्यशासनाकडुन काढण्यात आला नाही तर शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर भव्य महामोर्चा काढण्यात येण्यार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.