पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. महायुतीला यामध्ये घवघवीत यश आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरल्याचं एकंदर आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. अशात आता भाजपच्या या विजयामागे अनेक चेहरे आहेत त्यातील एक चेहरा आता समोर आला आहे. महायुतीच्या या विजयात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी अनुसूचित जाती, आणि दलित, वंचितांची निर्णायक मतं मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला असून त्यांनी का केलेल्या या कामगिरीची राज्यभर चर्चा सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अमित गोरखे यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून टाकला होता. या दौऱ्याच्या माध्यमातून गोरखे यांनी २३ जिल्हे, १५० हुन अधिक तालुके आणि ७२ विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील वंचित, मागासवर्गीय समाजातील सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक नेत्यांचा संविधान बदलण्याच्या फेक नरेटिव्हमुळे पराभव झाला होता. हे नरेटिव्ह दलित अनुसूचित संख्या जास्त असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसून आलं. दलित, वंचित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आघाडीचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला होता.
दरम्यान लोकसभेला जो संविधान बदलाचा नरेटीव्ह चालला. तोच नरेटीव्ह घेऊन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरली. मात्र हा नरेटिव्ह मोडून काढण्यात अमित गोरखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळलं. त्यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील वंचितांचा विश्वास संपादित केला. भाजपबद्दल संविधान बदलाच्या विषयीचा जो चुकीचा समज समाजात पसरवला गेला होता. तो त्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातून दूर करण्याचं महत्त्वाचं काम विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित गोरखे यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच महायुतीच्या या घवघवीत यशात अमित गोरखे यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच आगामी काळात पक्षाकडून त्यांनी केलेले या महत्वपूर्ण कामगिरीची नक्कीच दखल घेतली जाईल यात कोणतीही शंका नाही.