वाकड (Pclive7.com):- दोन महिला पोलिस कर्मचारी कर्तव्यावर असताना, रस्त्यावरील एक गरोदर महिलेला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिची अवस्था लक्षात घेता, या महिला पोलिसांनी तिला तत्काळ आडोशाला नेले. डॉक्टर आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका येईपर्यंत या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या वेळी महिला पोलिसांनी दाईचे कर्तव्य निभावले. ही घटना रविवारी (दि.१) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. राजश्री माधव वाघमारे (वय २५) असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. बाळ आणि बाळाची आई सुखरुप आहेत.

वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी वाहतूक विभागातील पोलिस हवालदार नीलम विजय चव्हाण व पोलिस अंमलदार रेश्मा नजीर शेख या दोघीही वाकड नाका येथे रविवारी कर्तव्यावर होत्या. दुपारी चारच्या सुमारास, त्यांना एक गरोदर महिला वेदनेने ओरडत असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, क्षणाचाही विलंब न करता नीलम आणि रेश्मा यांनी महिलेला आडोशाला नेले. तेथून १०८ नंबरवरील रुग्णवाहिकेशी संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिका येण्यास २० मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत राजश्री वाघमारे यांनी एका मुलाला जन्मा दिला. त्यानंतर रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरने बाळ आणि बाळंतीण यांची तपासणी केली. ते दोघेही सुखरूप असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना औंध रुग्णालयात नेले. महिला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिस आयुक्तांकडून कौतुक..
महिला पोलिस हवालदार नीलम विजय चव्हाण आणि अंमलदार रेश्मा नजीर शेख यांनी केलेल्या या कामगिरीबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे देखील उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group