पिंपळे सौदागर (Pclive7.com):- दिव्यांग व्यक्ती आणि बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उन्नति सोशल फाउंडेशनने भरीव योगदान दिले आहे. उन्नतीने दिलेला मदतीचा हात दिव्यांगांच्या प्रगतीसाठी वरदान ठरला, अशी भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केली असली तरी दिव्यांग घटकाप्रती सामाजिक बांधलकी जपण्याची आम्हाला संधी मिळाली, यात आम्ही कृतार्थ झालो, अशा शब्दांत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी समाधान व्यक्त केले.
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या टीमने वेळोवेळी पुढाकार घेऊन विशेष उपक्रम राबविले आहेत. सप्तर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मोफत औषधोपचार दिले. आजपर्यंत शेकडो दिव्यांग मुलांना व बालकांना मोफत औषध उपचार केले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच, झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून संस्थेने 2024 ला दिव्यांग बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा घेतला. असंख्य दिव्यांग जोडप्यांचा विवाह थाटात लावून दिला.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 01 डिसेंबर 2024 रोजी उन्नती फाउंडेशनने दिव्यांग बांधवांसाठी अति आवश्यक असलेले यु. डी. आय. डी. म्हणजेच वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र यासंदर्भात शिबिर घेतले. यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहयोग करण्यात आला. तसेच, बालेवाडी येथे पार पडलेल्या भारतीय पॅराऑलिम्पिक समितीमार्फत आयोजित दिव्यांग खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धेत व्ही. मनोजकुमार या खेळाडूला 50 मीटर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात कांस्यपदक प्राप्त झाले. खेळाडू चेन्नई येथून पुण्यात आले असल्याने व घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पुण्यात राहण्यासाठी उन्नती फाउंडेशनच्या मार्फत अर्थसहाय्य करण्यात आले.
अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद बालकांच्या निवासी संस्थेस अन्नधान्य देऊन विशेष मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. आळंदी येथील संस्थेतील अंध मुलींसाठी विमा सुविधा उपलब्ध होण्यासाठी उन्नती फाउंडेशनने पुढाकार घेतला.
दिव्यांग बालकांना सांभाळ करण्यात त्यांच्या माता व भगिनींचा मोलाचा वाटा असतो. अशा या मातांनी स्वतःलाही काही क्षण देता यावे या उद्देशाने उन्नती फाउंडेशनने पुढाकार घेऊन विशेष मुलांच्या मातांना व भगिनींना अंजनवेल कृषी पर्यटन, मुळशी येथे एक दिवसीय सहल काढली, यातून दिव्यांग समुदायात आम्हाला वावरता आले. त्यांचे जीवनमान जवळून पाहता आले. त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सहकार्य करता आले, यात आम्ही धन्य झालो, अशी भावना व्यक्त करत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांनी दिव्यांग बांधवांना मनपुर्वक शुभेच्छाही दिल्या.
उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून कुंदाताईंनी आणि संजय भिसे साहेबांनी वेळोवेळी सप्तर्षी फाउंडेशनला सहयोग केला आहे.
मी माझ्या सामाजिक जीवनात आजवर अनेक राजकीय व सामाजिक व्यक्ति बघितले आहेत परंतु दिलेला शब्द जागणारे आणि सतत संवेदनशील सामाजिक उपक्रमाला सहयोग करणारे व्यक्तिमत्व म्हणजे उन्नती फाउंडेशनचे कुंदाताई आणि संजय (आबा ) भिसे. जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा.– मनोजकुमार साहेबराव बोरसे, संस्थापक सचिव, सप्तर्षी फाउंडेशन.