पुणे (Pclive7.com):- मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समुदायांच्या घटनात्मक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमातीच्या वतीने आज चिंचवड येथे संविधान सुरक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
चिंचवड येथील मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल, द क्लोअर बँक्वेट हॉल, (डी मार्ट शेजारी) येथे शुक्रवारी (दि.१३ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन निवृत्त आयपीएस अधिकारी जेष्ठ विचारवंत अब्दुर रहमान यांच्या हस्ते होणार आहे.
माजी आमदार व संविधान तज्ञ ॲड. जयदेव गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या संमेलनामध्ये आरक्षण, वक्फ बोर्ड, दंगे, प्रतिनिधित्व, नफरती माहोल, ज्जिदो पर हमला, लव जिहाद, सीएए, एनआरसी, युसीसी, हेटस्पीच, बेगुनाह कैदी या ज्वलंत विषयांवर संमेलनात चर्चा, मार्गदर्शन होणार आहे. या संमेलनास मुस्लिम तसेच अन्य अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक हाजी युसुफ कुरेशी, शहाबुद्दीन शेख, हाजी सय्यद गुलाम रसूल, हाजी याकूब शेख यांनी केले आहे.