पिंपरी (Pclive7.com):- स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय २०१८ मध्ये कार्यान्वित झाल्यापासून पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी होती. अखेर वाकडमध्ये पोलिसांसाठी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
वाकड येथील कावेरीनगर येथील पोलिस वसाहतीत हे रुग्णालय सुरू केले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१३) उद्घाटन करण्यात आले. सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, विवेक पाटील, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, पुण्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, औंध रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नागनाथ एमपल्ले उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी अनुपमा कांबळे, डॉ. संजय भारती यांच्यासह आठजणांची रुग्णालयासाठी नियुक्ती केली आहे.
विनयकुमार चौबे म्हणाले की, कामाचा ताण आणि शारीरिक, मानसिक थकवा आल्याने पोलिसांना स्वतःकडे लक्ष देणे शक्य होत नाही. यातून आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. त्यासाठी आयुक्तालय स्तरावर पोलिस रुग्णालय कार्यान्वित केले आहे. यामाध्यामातून पोलिसांसाठी अनेक सुविधा आहेत.
पोलिसांची गैरसोय टळणार..
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ४,९२७ महिला आणि पुरुष अधिकारी आणि कर्मचारी कार्यान्वित आहेत. त्यांना पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस रुग्णालयात जावे लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. अनेकांना तिथेपर्यंत जाणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येच रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले.