संरक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच बैठक; नितीन गडकरी यांची ग्वाही
पिंपरी (Pclive7.com):- तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंतचा साडेतीन किलोमीटर अंतराचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी तत्काळ संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात घेऊन रखडलेल्या मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावर याबाबत संरक्षण विभाग आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच एकत्रित बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यामुळे रखडलेल्या मार्गाला गती मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील पहिले साडेतीन किलोमीटर म्हणजे देहूगाव ते देहूरोड हे अंतर रुंदीकरण करणे फार महत्त्वाचे आहे. लष्कराच्या ताब्यात ही जमीन आहे, त्यामुळे येथे अडचणी आहेत. हा सुरुवातीचा टप्पा अतिशय कठीण आहे. तुकारामांची पालखी निघताना गाव लोटलेला असतो. यावेळेस या पालखी मार्गावरून बससेवा, वाहतूक आदी बंद ठेवावी लागते. त्याचा स्थानिक नागरिकांना खूप मोठा फटका बसतो. त्यामुळे देहूगाव ते देहूरोड हे अंतर रुंदीकरण करण्याची वारकऱ्यांची मागणी आहे.
याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठविला. ते म्हणाले, देहूगाव ते देहूरोड या साडेतीन किलोमीटर अंतराचा पालखी मार्ग संरक्षण विभागाच्या हद्दीतून जातो. या जागेचा ताबा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या जागेतील मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. यामुळे वारकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता पंढरपूर वारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर होणारी वाहतूक आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय अत्यंत गरजेचा आहे. रस्त्याच्या देखभालीसाठी तसेच वारीच्या पवित्र सोहळ्याच्या सोईसाठी रखडलेला मार्गाचे रुंदीकरण करणे भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग कधीपर्यंत पूर्ण होईल. संरक्षण विभागासोबत जागेसंदर्भात काय कारवाई केली जाईल असा प्रश्न खासदार बारणे यांनी केला. त्यावर उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, रखडलेल्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरात लवकर संरक्षण विभागासोबत बैठक घेतली जाईल. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशीही चर्चा केली जाईल. त्यात मार्ग काढून काम पूर्ण केले जाईल.
नितीन गडकरी यांचे अभिनंदन
देहूतून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग जात आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. वारकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पालखी मार्ग केल्याबद्द खासदार बारणे यांनी नितीन गडकरी यांचे लोकसभेत अभिनंदन केले.
देहूगाव ते देहूरोडपर्यंत पालखी मार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणाबाबत लवकरच संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याची ग्वाही मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार मावळ लोकसभा.