पिंपरी (Pclive7.com):- एका नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास च-होली येथे घडली. अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका आरोपीला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे.
सचिनकुमार लखींदर राय (२३, रा. बंगरी, जि. मुझफ्फरपूर, बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गौतम रामानंद राय (२२, रा. तेजस रेसीडन्सी, मंगलनगर, वाकड. मूळगाव मु. बंगरी, पो. मरवन, ता. काटी, जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, त्याचा अल्पवयीन साथीदार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथे सचिनकुमार राय याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, खंडणी विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता त्यावरून आरोपी गौतम राय याचे नाव निष्पन्न झाले. हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक, वाकड येथून पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.
मयत सचिनकुमार राय याचे आरोपीच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्यासाठी त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. खंडणी विरोधी पथकाने आरोपीला दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक फौजदार सुनील कानगुडे, अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.