पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, वाकड परिसरात राहतो. त्यांच्या सुलभ वाहतूकीसाठी या मार्गावर बीआरटी सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. भविष्यात ही सुविधा देखील अपुरी पडण्याची शक्यता आहे. म्हणून नाशिकफाटा ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो सुरू व्हायलाच हवी, त्यासाठी मेट्रोचा डीपीआर लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी ते निगडी आणि नाशिकफाटा ते चाकण मार्गावर मेट्रोकरिता डीपीआर तयार करण्याच्या खर्चास नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरी देण्यात आली. त्यानुसारच नाशिकफाटा ते हिंजवडी मेट्रो मार्गाचा देखील डीपीआर तयार करावा. पिंपळे सौदागरमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प विकसित होत आहेत. येथील लोकसंख्याही त्याचपटीत वाढत आहे. सध्या येथे बीआरटीमार्गावर सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. भविष्यात ही सेवा अपुरी पडण्याची शक्यता आहे. हा ताण कमी करण्यासाठी बीआरटी मार्गाला समांतर असा मेट्रोचा मार्ग देखील सुरू करून देणे आवश्यक आहे. यामुळे मल्टीमॉडेलची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, वाकड याभागातून सुमारे दीड लाख नागरिक कामानिमित्त हिजंवडी येथे ये-जा करतात. यासर्व बाबींचा विचार करून या मार्गावर मेट्रोचे नियोजन सुरू करायला हवे. त्यासाठी लवकरात लवकर नाशिकफाटा ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा डीपीआर तयार करावा अशी मागणी शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group