पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येक समितीत सत्ताधारी भाजपच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि.२०) वर्णी लावण्यात आली.
महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेत पाच विषय समित्या आहेत. त्यातील स्थायी समिती गेल्या महिन्यात अस्तित्वात आली. उर्वरित विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांची एक वर्षांची मुदत या महिनाअखेर संपणार आहे. त्यामुळे या चारही विषय समित्यांवर नगरसेवकांमधून नवीन सदस्यांची निवड करणे गरजेचे होते. कायद्यानुसार चारही विषय समित्यांची सदस्य संख्या ९ आहे.
या समित्यांवर दरवर्षी नवीन सदस्यांची निवड करून त्यातून एकाची सभापती म्हणून निवड होते. ९ सदस्यांची राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार निवड केली जाते. प्रत्येक समितीत सत्ताधारी भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची सदस्य म्हणून वर्णी लावणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चारही विषय समित्यांवर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार निवड करण्यात आली.
विधी समितीवर भाजपच्या माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, माई ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे या नगरसेवकांची, राष्ट्रवादीच्या सुमन पवळे, संगिता ताम्हाणे, निकीता कदम या तीन नगरसेवकांची आणि शिवसेनेच्या सचिन भोसले या नगरसेवकाची सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली. महिला व बालकल्याण समितीवर भाजपच्या हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुंढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे या पाच नगरसेवकांची, राष्ट्रवादीच्या स्वाती कुटे, मंगला कदम, वैशाली काळभोर या तीन नगरसेवकांची आणि शिवसेनेच्या मिनल यादव या नगरसेवकाची निवड करण्यात आली.
शहर सुधारणा समितीवर भाजपच्या सिमा चौघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड या पाच नगरसेवकांची, राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर, उषा वाघेरे, सुलक्षणा धर या तीन नगरसेवकांची आणि शिवसेनेच्या निलेश बारणे या नगरसेवकाची निवड करण्यात आली. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर भाजपच्या अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजात पालांडे, अश्विनी बोबडे, संजय नेवाले या पाच नगरसेवकांची, राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे, संजय वाबळे, अपर्णा डोके या तीन नगरसेवकांची आणि शिवसेनेच्या अश्विनी वाघमारे या नगरसेवकाची निवड करण्यात आली.