चाकण (Pclive7.com):- चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरने (एचआर ५५/एव्ही २२८३) आज (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव चौकात एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर इतर सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये पोलिसांच्या वाहनाला देखील धडक दिली असून एक वॉर्डन जखमी झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने वेळेतच वाहनातून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून चांगला चोप दिला आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी नेले आहे.
याबाबत माहिती अशी की, चाकण येथून शिक्रापूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने तळेगाव चौकात एका मोपेड दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवर दोन महिला आणि एक ११ वर्षीय मुलगी जात होत्या. कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला आणि मुलगी रस्त्यावर पडल्या. मुलीच्या पायावर कंटेनरचे चाक गेले आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर कंटेनर शिक्रापूरच्या दिशेने निघून गेला. तसेच तो रस्त्यात आणखी वाहनांना धडक देत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली.
कंटेनरने पुढे जात असताना सुरुवातीला एका कारला धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर थांबण्याऐवजी चालकाने कंटेनर तसाच पुढे नेला. त्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अंतर्गत असलेल्या शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाजेवाडी येथे कंटेनर चालकाला पकडण्यात यश आले. दरम्यान कंटेनरने सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. चाकण आणि शिक्रापूर पोलिसांनी वाजेवाडी येथे रस्त्यात डंपर आडवा लावून कंटेनर अडवला. त्यानंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला चांगला चोप दिला. त्यात कंटेनर चालक जखमी झाला आहे. कंटेनरने पोलिसांच्या वाहनाला देखील धडक दिली असून त्यामध्ये एक वॉर्डन जखमी झाला आहे.