पिंपरी (Pclive7.com):- एफएक्स रोड ट्रेडिंग या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून दिघी येथील एका व्यक्तीची ३९ लाख ८३ हजार ७३० रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २६ फेब्रुवारी ते दोन मे या कालावधीत दिघी येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.

याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एफएक्स रोड ट्रेडिंग हे ॲप्लीकेशन चालवणारे चालक, टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन, कॉलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि बँक खातेधारकाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व्यक्तीने एफएक्स रोड ट्रेडिंग कंपनीचे एप्लीकेशन फेसबुक लिंक वरुन डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकांचा आणि इतर व्यक्तींचा फोन आला फोनवरील व्यक्तींनी कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन केले. फिर्यादी यांचे ट्रेडिंग अकाउंट सुरू करण्यात आले. तसेच, वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडले. पैसे गुंतवणूक केल्यानंतर ते पैसे वाढत असल्याचे त्या ॲप्लीकेशनमध्ये दाखविण्यात आले.
काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे काढून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर एका महिलेने फिर्यादीस फोन करुन आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एकूण ३९ लाख ८३ हजार ७३० रुपये भरले. मात्र, आरोपींनी त्यांना कोणताही मोबदला अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलिस पुढील तपास करीत आहेत.